काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित केलेल्या मोर्चात संगमनेरकरांनी चांगलीच गर्दी केली होती. या वेळी आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि कीर्तनकार भंडारे यांच्यावर टीकास्त्र सोडले. थोरात यांच्या भाषणाआधी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी भाषण केले. आपल्या भाषणात तांबे यांनी संगमनेरमध्ये झालेल्या प्रकरणावर रोखठोक भाष्य केले.
थोरांतावर केलेली टीका नसून सगळ्या संगमनेरकरांवर केलेली टीका आहे. आजचा मोर्चा हा थोरातांवर प्रेम करणाऱ्यांचा मोर्चा आहे. थोरातांनी विकाससाठी सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली आहे. पूर्वीच्या काळी टोकाचे राजकारण होते पण त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. लोकांनी आम्हाला पराभूत केले, त्यांचा कौल मान्य केला. पण तु्म्ही तालुक्याला मागे नेता कामा नये असे तांबे म्हणाले.
advertisement
तुम्ही सत्ताधारी आमदार, मी पण...
सत्यजित तांबे यांनी आमदार अमोल खताळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले की, तुम्हाला दिलेल्या संधीचे सोनं करता आलं पाहिजे. मात्र, तुम्ही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना तालुक्यात आणून मागे नेण्याचा प्रयत्न करत असाल संगमनेरकर जनता माफ करणार नाही.तुम्ही जर सत्ताधारी आमदार असाल असं तुम्हाला वाटत असेल तर मी पण विरोधी आमदार नाही, असे वक्तव्य सत्यजित तांबे यांनी केले.
तांबे यांच्या वक्तव्याची चर्चा...
सत्यजित तांबे हे विधान परिषदेवर अपक्ष आमदार आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. पक्षाचा एबी फॉर्म असूनही काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या दरम्यान सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांना भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा होती. सत्यजित तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी आज संगमनेरमध्ये केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.