रत्नागिरी : सावर्डे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी चिपळूण येथे रत्नागिरी विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणात पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका खाजगी व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यामार्फत ही रक्कम स्वीकारण्याची व्यवस्था केल्याचे उघड झाले आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, सावर्डे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 14/2026 या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांच्याकडे प्रलंबित होता. पुणे येथील एका मृत व्यक्तीच्या वारसांना विमा रक्कम मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करायचा होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पोलीस ठाण्याकडून मिळणे गरजेचे होते. ही कागदपत्रे देण्यासाठी कांबळे यांनी सुरुवातीला तब्बल 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. मात्र तक्रारदाराशी तडजोडीनंतर ही रक्कम पंधरा हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल
या मागणीमुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी चिपळूण येथे सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे ही रक्कम थेट पोलीस उपनिरीक्षकांकडे न घेता, त्यांच्या सूचनेनुसार एका खाजगी व्यक्तीमार्फत पानाच्या टपरीवर स्वीकारण्यात येणार होती. नियोजित वेळी तक्रारदाराने पंधरा हजार रुपये दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तत्काळ कारवाई करत त्या खाजगी व्यक्तीस रंगेहाथ पकडले. चौकशीत ही रक्कम मनीष कांबळे यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
संपूर्ण पोलीस दलात खळबळ
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून, प्रामाणिक सेवेचा दावा करणाऱ्या यंत्रणेतच अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा :
