आई अंबाबाईचा हाच संस्कार! लेकीचं लग्न तोंडावर अन् पुजाऱ्याला सापडलं सोनं, पाहा काय केलं? Video
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sangli News: 'आई अंबाबाईची सेवा करतो, तिने दिलेला हाच संस्कार आहे,' असे म्हणत त्यांनी केवळ माणुसकीचा धर्म पाळला.
सांगली: आजच्या काळात जिथे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत आणि पैशासाठी नाती तुटताना दिसतात, तिथे सांगलीच्या वांगी गावातील एका पुजाऱ्यांच्या कामगिरीने माणुसकीची उंची आभाळाला नेऊन ठेवली आहे. महादेव नामदेव गुरव या अंबिका देवीच्या पुजाऱ्याने डॉ. निवास मोकळे यांची सुमारे सव्वा दोन लाख रुपयांची हरवलेली अंगठी परत करून समाजासमोर प्रामाणिकपणाचा आदर्श उभा केला आहे.
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावातील श्री अंबिका देवीचे पुजारी महादेव गुरव यांनी याबाबत अधिक माहिती दिली. डॉ. निवास दादू मोकळे हे नेहमीप्रमाणे उसाच्या फडात जनावरांचा चारा आणण्यासाठी गेले होते. मनात कामाची घाई आणि यात्रेचे नियोजन होते. पण घरी आल्यावर हात-पाय धुताना त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या बोटातील दीड तोळ्याची, लाल खड्याची सोन्याची अंगठी गायब होती. डॉ. मोकळे यांनी अंगठीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
advertisement
पुजाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि 'तो' फोन!
योगायोगाने तिथून वांगी विकास सोसायटीचे कर्मचारी आणि अंबिका मातेचे पुजारी महादेव नामदेव गुरव जात होते. त्यांनी डॉ. मोकळे यांची विचारपूस केली आणि हरवलेल्या अंगठीबाबत त्यांचे ऐकून घेतले. यानंतर डॉ. मोकळे आशा सोडून घरी आले. पण महादेव गुरव यांनी स्वतः शोध घेण्याचे ठरवले.
advertisement
काहीवेळाने रहदारीच्या रस्त्यावर एका लाल खड्यानं त्यांचे लक्ष वेधले. गाडीखाली आल्यामुळे थोडी दबलेली ती अंगठी गुरव यांना सापडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता डॉ. मोकळे यांना फोन केला. आणि शब्द होते; "अंबाबाईच्या नावानं चांगभलं!" तुमची अंगठी सापडली आहे.
बक्षीस नाकारणारा 'देवमाणूस'
डॉ. मोकळे जेव्हा अंगठी घेण्यासाठी गुरव यांच्याजवळ पोहोचले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. दीड तोळ्याचे सोने म्हणजे आजच्या काळात मोठी रक्कम आहे. कृतज्ञता म्हणून त्यांनी महादेव गुरव यांना रोख रकमेचे बक्षीस देऊ केले. पण त्या 'देवमाणसाने' ते नम्रपणे नाकारले. 'आई अंबाबाईची सेवा करतो, तिने दिलेला हाच संस्कार आहे,' असे म्हणत त्यांनी केवळ माणुसकीचा धर्म पाळला.
advertisement
याहून विशेष म्हणजे महादेव गुरव यांच्या मुलीचे लग्न आठवड्यावर असताना त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा सोन्याहून कित्येक पटीने मौल्यवान माणुसकीचे उदाहरण ठरल्याची भावना डॉ. मोकळे यांनी लोकल18 सोबत बोलताना व्यक्त केली.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 3:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
आई अंबाबाईचा हाच संस्कार! लेकीचं लग्न तोंडावर अन् पुजाऱ्याला सापडलं सोनं, पाहा काय केलं? Video





