पोलिसांचा हायवेवर थरार! मुंबईला निघालेली गोव्याची दारू वाटेतच जप्त; 42 बॉक्ससह आलिशान Creta ताब्यात
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुंबई - गोवा मार्गावरील अवैध दारू तस्करीचे जाळे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
राजेश जाधव, प्रतिनिधी
रत्नागिरी : गोव्याकडून मुंबईकडे अवैधरीत्या वाहतूक केली जात असलेली गोवा बनावटीची दारू सावर्डे पोलिसांनी मोठ्या कारवाईत जप्त केली आहे. या धडक कारवाईत तब्बल 42 बॉक्स दारू हस्तगत करण्यात आली असून, एक क्रेटा कार ताब्यात घेण्यात आली आहे. या घटनेमुळे गोवा–मुंबई मार्गावरील अवैध दारू तस्करीचे जाळे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
advertisement
सावर्डे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयास्पद क्रेटा वाहनाबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सावर्डे परिसरात नाकाबंदी करत पोलिसांनी सापळा रचला. संबंधित वाहन येताच पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनात लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणातील गोवा बनावटीची दारू आढळून आली.
वाहनातून तब्बल 42 बॉक्स दारू जप्त करण्यात आली असून, पोलिसांनी तात्काळ वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच संबंधित वाहनचालकास ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूचे बाजारमूल्य आणि एकूण साठ्याचा तपशील मोजणीअंती स्पष्ट होणार असून, त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
advertisement
राज्य उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून ही दारू गोव्यामधून अवैधरीत्या खरेदी करून मुंबईत विक्रीसाठी नेली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. यामागे संघटित टोळी कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक स्वरूपात केला जात आहे.
advertisement
अवैध दारू वाहतुकीला मोठा आळा बसणार
दरम्यान, सावर्डे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध दारू वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गोवा–मुंबई मार्गावर अवैध दारू तस्करीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून, पुढील काळात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 4:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलिसांचा हायवेवर थरार! मुंबईला निघालेली गोव्याची दारू वाटेतच जप्त; 42 बॉक्ससह आलिशान Creta ताब्यात









