दत्ता मेघे हे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रीय होते. विदर्भात राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आपल्या कामाने त्यांनी छाप सोडली. आपल्या उमेदीची वर्षे त्यांनी काँग्रेस पक्षात घालवली. आयुष्याच्या उत्तरार्ध त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असतानाही राजकारणापलीकडचं मैत्र त्यांनी जपले. विदर्भात शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून दत्ता मेघे यांची ओळख राहिली. १९७८ च्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले.
advertisement
विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते पहिलेच
रामटेक वर्धा आणि नागपूर अशा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. राज्यसभेतही सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. राज्याचे ते विरोधी पक्षनेतेही राहिले.
शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात दत्ता मेघे यांचे उल्लेखनीय काम
नागपूर, वर्धा जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणीत दत्ता मेघे यांचे योगदान राहिले. गडचिरोलीपासून मेळघाटपर्यंत आदिवासी भागात दत्ता मेघे यांनी मोफत वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले. सावंगी मेघे येथे त्यांनी गरिबांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले.
माझे थोरले बंधू गेले, नितीन गडकरी गहिवरले
ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा भावना गडकरी यांनी व्यक्त केल्या.
दातृत्व अंगी असलेला असा मोठ्या आणि निर्मळ मनाचा नेता पुन्हा होणे नाही. विदर्भातील शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील दत्ताभाऊंचे योगदान उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. विदर्भातील तरुणांना उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली. माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात आणि पुढेही वैचारिक विरोधक असूनही दत्ताभाऊंनी कायम मला प्रेम-जिव्हाळा दिला व मार्गदर्शन केले. लहान बंधू प्रमाणे त्यांनी नेहमीच माझ्यावर प्रेम केले. प्रकृती अस्वास्थ्य असूनही विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे सर्वसमावेशी नेतृत्व राजकीय कार्यकर्त्यांसाठी आदर्श होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या परिवारास आणि सर्वांनाच या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो- नितीन गडकरी
