नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील शिवाजी पार्क परिसरात राहणारे अशोक कृष्णा सराफ (७७) यांना सायबर भामट्यांचा फोन आला. आरोपींनी स्वतःची ओळख टेलिफोन डिपार्टमेंट, सर्व्हिलन्स अधिकारी आणि त्यानंतर सीबीआय अधिकारी अशी करून दिली. आरोपींनी सराफ यांना सांगितले की, त्यांच्या कॅनरा बँकेच्या खात्याचा वापर 'नरेश गोयल' यांच्यावरील ईडी (ED) कारवाईतील मनी लाँड्रिंगसाठी झाला आहे.
advertisement
अटकेची भीती आणि 'लिगेलिटी'चा बनाव
आरोपींनी सराफ यांचे मानसिक खच्चीकरण करत त्यांना अटकेची भीती दाखवली. तुमच्या बँक खात्यातील आणि म्युच्युअल फंडातील रक्कमेची 'लिगेलिटी' (वैधता) तपासायची आहे, असा बनाव त्यांनी रचला. ही तपासणी पूर्ण झाल्यावर पैसे परत दिले जातील, असे खोटे आश्वासन देऊन सराफ यांना त्यांच्या खात्यातील रक्कम विशिष्ट बँक खात्यांवर पाठवण्यास भाग पाडलं. भामट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या सराफ यांनी तब्बल १ कोटी रुपये ट्रान्सफर केले, मात्र त्यानंतर त्यांना कोणतीही रक्कम परत मिळाली नाही.
सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सराफ यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी काही मोबाईल नंबर आणि बँक खात्यांच्या मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २०५, ३०८(१), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी), ६६(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.
