शहापूरमध्ये बाप्पाला निरोप देताना चिमुकलीनं चक्क हंबरडा फोडला. गौरी-गणपती विसर्जनाच्या वेळी एका चिमुकलीने बाप्पाला निरोप देताना चिमुकली जोरजोरात रडायला लागली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तो अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.

advertisement

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ शहापूर तालुक्यातील साने गावातील श्राव्या प्रमोद पाटील या लहान मुलीचा आहे. श्राव्याच्या घरी सात दिवसांचा गौरी-गणपती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. या काळात तिने गणरायाच्या सजावटीपासून ते पूजे-आरतीपर्यंत सर्व कामांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पण जेव्हा विसर्जनाचा दिवस उजाडला, तेव्हा तिच्या निरागस मनाला बाप्पाचा निरोप घेणे सहन झाले नाही.

advertisement

जसजसे बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाण्याची वेळ आली, तसतशी श्राव्या धायमोकलून रडू लागली. तिचे रडणे पाहून कुटुंबीयांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिची समजूत काढली आणि "पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार," असे आश्वासन दिले. त्यानंतरच तिचे रडणे थांबले.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरत आहे. नेटकऱ्यांनी या चिमुकलीच्या निरागस भक्तीची आणि तिच्या बाप्पावरील निस्सीम प्रेमाची भरभरून प्रशंसा केली आहे. हा क्षण गणेशोत्सवाचा खरा अर्थ दाखवतो, जिथे भक्ती आणि भावनांचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो.

advertisement