स्थानिक पातळीवर युती आघाडी करायला कोणतीही अट नाही. युती आघाडी कुणाशी करायची, हा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असं पवारांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र लढणार का? याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार पक्ष म्हणून मतदान करत नसतो. याआधीच्या निवडणुका आम्ही पार्टी म्हणून निवडणुका लढलो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने आम्ही सांगितलं आहे, की त्या-त्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात पक्षाच्या सहकाऱ्यांनी स्थानिक स्थिती बघून निर्णय घ्यावा.. हा निकाल त्यांचा असेल."
advertisement
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले, "काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार की नाही, हे मला माहीत नाही. पण त्यांनी तसा निर्णय घेतला तरी त्यात काही आश्चर्य नाही. स्पष्ट सांगायचं म्हणजे अजून मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत."
अधिकृत पैसे वाटून निवडणुकीला सामोरं जाणं चुकीचं - शरद पवार
यावेळी पवारांनी बिहार निवडणूक निकालावर देखील भाष्य केलं. "या निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला फिडबॅक असा आला की, या निवडणुकीचं मतदान महिलांनी हातात घेतलं. महिलांच्या खात्यावर 10 हजार आले, त्याचा हा परिणाम असावा असं वाटतं. महाराष्ट्रातसुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाटले. लाडक्या बहिणीच्या योजनेतून अधिकृतरित्या पैसे वाटले. तसंच या वेळीही झालं. इथून पुढे ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाआधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करुन निवडणुकीला सामोरं जायचं, ही भूमिका घेतली तर निवडणूक पद्धतीवरचा लोकांचा विश्वास उडेल. निवडणूक आयोगानेसुद्धा याचा विचार केला पाहिजे. निवडणूक ही स्वच्छ आणि पारदर्शक व्हावी, याकडे लक्ष दिलं पाहिजे. 10 हजार रुपये ही काय लहान रक्कम नाही. ५० टक्क्यांहून अधिक महिलांचं मतदान आहे. सत्तेत असलेल्यांनी अधिकृतपणे पैसे वाटणं हे चिंताजनक आहे, असंही शरद पवार म्हणाले.
