नेमकी घटना काय?
मुंबईच्या रहिवासी प्रिया पाटील या बुधवारी (१४ जानेवारी) शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने निघाल्या होत्या. गाडी सुटण्यापूर्वी त्या स्थानकावरील 'जन आहार' कँटीनमध्ये थांबल्या होत्या. गाडी सुटायला अवघे काही मिनिटे शिल्लक असल्याने, घाईघाईत त्या त्यांची पर्स टेबलवरच विसरल्या आणि डब्यात जाऊन बसल्या.
अनिल तायडे यांचा प्रामाणिकपणा: कर्तव्यावर असलेले उपस्थानक व्यवस्थापक (वाणिज्य) अनिल तायडे यांना कँटीनमधील कर्मचाऱ्याने या विसरलेल्या पर्सबद्दल माहिती दिली. तायडे यांनी त्वरित स्थानकावर अनाउन्समेंट केली, मात्र गाडी सुटण्याची वेळ झाल्याने त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तायडे यांनी वेळ न घालवता पर्स उघडून पाहिली, तेव्हा त्यात कागदपत्रांसह तब्बल ३ लाख रुपयांची रोकड आढळली.
advertisement
पर्समधील कागदपत्रांच्या आधारे तायडे यांनी प्रिया पाटील यांचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि त्यांच्याशी संपर्क साधला. खात्री पटल्यानंतर तायडे यांनी स्वतः गाडीच्या डब्यात जाऊन ती पर्स पाटील यांच्या स्वाधीन केली. आपली ३ लाखांची रोकड सुरक्षित असल्याचे पाहून प्रिया पाटील भावूक झाल्या आणि त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळेच रेल्वेवरील प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
