शिरपूर जंगलात पोलिसांचं मोठं ऑपरेशन
शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी जमन्यापाणी गावाच्या हद्दीत वन विभागाच्या राखीव जमिनीवर मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली होती. हा परिसर डोंगराळ आणि जंगलांच्या मध्ये असल्याने जप्त केलेल्या गांजाची रोपे पोलीस ठाण्यात किंवा शहरात नेणं आव्हानात्मक होतं. या समस्येचा अंदाज घेऊन, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ताबडतोब न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून विशेष परवानगी घेतल्यानंतर, पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जंगलातच गांजा नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
दोन ठिकाणी कारवाई: ४०,००० चौरस फूट जागेवर होती गांजाची शेती
पोलिसांची ही कारवाई प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली. पहिली कारवाई जमन्यापाणी वनक्षेत्रातील भोरखेडा येथे झाली. इथं तब्बल ४०,००० चौरस फूट जमिनीवर गांजा पिकवला होता. कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्व गांजा जाळून टाकला.
दुसरी कारवाई बाभळज परिसरात करण्यात आली. येथील तस्करांना पोलिसांच्या छाप्याची कल्पना आली असावी. कारण पोलीस कारवाईच्या आधी अज्ञात आरोपींनी गांजाचा ८२ गुंठ्यावरील गांजा कापला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी तो जमिनीवर फेकला होता. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कापणी केलेला गांजा जप्त केला आणि तो सगळा जाळून टाकला
या संपूर्ण कारवाईदरम्यान, धुळे पोलिसांनी वन विभागाच्या क्षेत्रातील हद्दीतील एकूण १२२ गुंठे जमीन साफ केली. दोन्ही ठिकाणी २१ क्विंटलपेक्षा अधिक गांजा नष्ट केला. सरकारी आकडेवारीनुसार, नष्ट केलेल्या गांजाची एकूण किंमत १ कोटी ६ लाख इतकी असल्याची माहिती आहे.
