मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्यावरही याचे परिणाम दिसून आले. दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडत आहेत. ठाकरे गटाचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क येथे पार पडत असताना दुसरीकडे शिंदे गटाने आपल्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान निश्चित केले. यंदाही शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पावसामुळे यात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यावर यंदा पावसाचे सावट आले आहे. दरवर्षीप्रमाणे आझाद मैदानात हा मेळावा घेण्याची प्राथमिक तयारी रविवारी सुरू झाली. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने, पक्षाने पर्यायी बंदिस्त स्थळांची चाचपणी सुरू केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वरळी डोम, गोरेगाव नेस्को आणि आणखी एका बंदिस्त स्थळाचा पर्यायी पर्याय म्हणून कोअर कमिटी स्तरावर विचार सुरू आहे. पावसामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवसैनिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी ही तातडीची हालचाल करण्यात येत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसामुळे पूरजन्य परिस्थिती असल्याने, ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांचा मेळाव्यात सहभाग मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या मेळाव्याची प्रमुख जबाबदारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसैनिकांवर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्यास आणि मेळाव्याच्या तयारीत अडथळा न आल्यास, कार्यक्रम आझाद मैदानातच होईल, अशी माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली. पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
ठाकरे गट भरपावसात घेणार मेळावा?
शिवसेना ठाकरे गटाकडून आपला दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर घेण्याची तयारी सुरू केली आहे. पावसामुळे मैदानावर चिखल झाला असला तरी त्यावर पर्याय शोधून हा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. या महापालिका निवडणुकीआधीच संघटनेत नव्याने उत्साह निर्माण करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे.