मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दबावानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक भूमिकेत आली आहे. सन्मानजनक जागावाटप न झाल्यास मुंबईतील सर्व २२७ जागा स्वबळावर लढवण्याचा पर्याय खुला ठेवावा, असा दबाव पक्षातील पदाधिकारी आणि नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टाकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीतील जागावाटपासाठी मोठ्या प्रमाणात तडजोड केली, मात्र आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कोणतीही तडजोड करू नये, अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. “महापालिका ही पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची खरी कसोटी आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे,” अशी स्पष्ट मागणी नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
advertisement
शिंदे गटाकडे इच्छुकांची मोठी गर्दी...
मुंबई महापालिका निवडणूक उमेदवार निवडीच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. मंगळवारी २२७ जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पहिल्याच दिवशी तब्बल २,४०० इच्छुकांनी मुलाखती दिल्याने पक्षातील उत्साह आणि तयारी स्पष्ट झाली आहे.
पदाधिकारी आक्रमक, शिंदे काय म्हणतात?
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना 'श्रद्धा आणि सबुरी' राखण्याचा सल्ला दिला आहे. “केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील जागावाटपाचा प्रश्नही माझ्यात आणि देवेंद्रजी यांच्यात चर्चेतूनच सुटेल,” असे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.
चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी नेत्यांकडे व्यक्त केला असून, अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
