मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा संगमनेरमध्ये शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटनाला गेले होते. खांडगाव इथं एका व्यक्तीने खताळ यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी समोर आला. त्यानंतर त्याने खताळ यांच्यावर हल्ला केला.
अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. मालपाणी उद्योग समुहाच्या सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला लगेच ताब्यात घेतलं. आमदार खातळ यांच्यावरील हल्ल्याची बातमी बघता बघता वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे खताळ यांच्या शेकडो तरुण समर्थकांनी मालपाणी लॉन्सकडे धाव घेतली. मालपाली लॉन्सबाहेर समर्थकांनी तुफान गर्दी झाली होती.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शहरात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा तरुण कोण आहे, त्याने खताळ यांच्यावर हल्ला का केला, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. पण, ऐन गणेशोत्सवाच्या काळात आमदार खताळ यांच्यावर हल्ला झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्याच्या घटनेमुळे गणेशोत्सवात संगमनेरातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.