नेमका वाद काय?
नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मधून बाळासाहेब देशमुख हे शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. आपले तिकीट कापण्यामागे आमदार बालाजी कल्याणकर यांचा हात असल्याचा थेट आरोप देशमुख यांनी केला होता. उमेदवारी न मिळाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नाराज होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बाळासाहेब देशमुख यांनी थेट आमदार बालाजी कल्याणकर यांचे निवासस्थान गाठले. तिथे त्यांनी आमदारांना उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आमदार कल्याणकर यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर भाग्यनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलली.
advertisement
पोलिसांनी बाळासाहेब देशमुख यांना भर रस्त्यात अडवून ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. "आमदारांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, कायद्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे," अशी माहिती भाग्यनगर पोलिसांनी दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवकाला अशा प्रकारे अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अटकेनंतर नांदेडमधील शिवसेना शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
