नाशिकच्या निफाडमध्ये 24 फेब्रुवारीपासून महिला बेपत्ता होती, त्यानंतर नातेवाईकांनी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरूवातीला हे साधं बेपत्ता झाल्याचं प्रकरण वाटत होतं, पण नंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या टीमने तपासाची चक्र फिरवली आणि आरोपीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं.
आरोपीचा बनाव
आरोपी सुरूवातीला 'मी नाही त्यातला' असा बनाव करून पोलिसांना गुंगारा द्यायचा प्रयत्न करत होता, पण निफाड पोलिसांच्या चौकशीसमोर त्याचे सगळे डाव कोसळले. तांत्रिक तपास आणि कौशल्याचा वापर करून पोलिसांनी आरोपीला कोंडीत पकडलं आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
विष पिऊन तपास भरकटवला
महिलेची गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह पोत्यात कोंबला त्यात दगड कोंबले आणि देवपूर रोड लगतच्या पडक्या विहिरीत फेकून दिला. एवढंच नाही तर त्याने स्वतःला वाचवण्यासाठी आणि गुन्हा पचवण्यासाठी विष पिण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. निफाड पोलिसांनी थंड डोक्याने रचलेल्या या क्रुर कटाचा उलगडा करत आरोपीला कायद्याच्या कचाट्यात ओढलं, पण या हत्येच्या या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, विभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पीएसआय विजय गायकवाड यांनी अक्षरशः तपासाची चक्रे झपाट्याने फिरवत आरोपीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली. या संपूर्ण प्रकरणात निफाड पोलीस कर्मचारी नितीन सांगळे, मनीषा गायकवाड, संगीता जाधव, धनंजय जाधव, अरविंद ढवळे, धनंजय बैरागी, विनोद जाधव, राजेंद्र दरोडे, सागर सानप, सुधाकर चव्हाणके यांनी जीव तोडून काम करत तपासाला निर्णायक वळण दिलं.
