धुळीमुळे होणारा सर्वात जास्त परिणाम आपल्या श्वसनसंस्थेवर होतो. श्वासावाटे सतत प्रदूषित हवा शरीरात गेल्याने अॅलर्जी, दमा किंवा श्वसनाचे विकार यांसारख्या तक्रारी वाढतात. केसांमध्ये धूळ साचल्याने केस कोरडे पडतात, कोंडा निर्माण होतो. याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास केस गळतीही वाढू शकते. त्वचेवर धुळीचे कण साचल्याने पुरळ येणे, मुरुम येणे आणि खाज येण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवासानंतर शरीराची योग्य काळजी घेणं गरजेचं ठरतं.
advertisement
Health Tips: दिवसातून किती कप चहा पितात? तुम्हाला माहितीये का एका कपाचा शरिरावर होता असा परिणाम
काही घरगुती उपाय केल्यास हवा प्रदूषामुळे होणाऱ्या समस्यांपासून आपण आपला बचाव करू शकतो. प्रवासादरम्यान नाक-तोंड झाकणारा मास्क, डोळ्यांना सनग्लासेस आणि डोक्यावर स्कार्फचा वापर करणं गरजेचं आहे. घरी आल्यानंतर कोमट पाणी आणि सौम्य साबणाने चेहरा स्वच्छ करावा. आठवड्यातून दोनदा बेसन आणि दही यांचा लेप लावल्यास प्रदूषणामुळे शुष्क झालेली त्वचा तजेलदार होते. केसांना आठवड्यातून किमान दोनदा नारळ किंवा बदामाच्या तेलाने मसाज करावी. त्यानंतर शिकेकाई किंवा लिंबाच्या पानांचा नैसर्गिक शॅम्पू वापरल्यास केस सुरक्षित राहतील.
श्वसन संस्थेला योग्य पद्धतीने कार्यान्वित ठेवण्यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे, हा उत्तम उपाय मानला जातो. गरम पाण्यात थोडा ओवा टाकल्यास श्वसनमार्ग स्वच्छ राहतात. हळदीचं दूध प्यायल्याने शरीरातील संसर्गजन्य घटकांवर नियंत्रण ठेवता येतं. तसेच, सकाळी व्यायाम आणि प्राणायाम केल्यास फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि धुळीचा त्रास कमी होतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रवासानंतर शरीराची निगा राखणं, अतिशय गरजेचं आहे. अतिशय किरकोळ वाटणाऱ्या तक्रारी पुढे जाऊन गंभीर आजारांचं रूप धारण करू शकतात. धुळीपासून संरक्षणासाठी मास्क, सनस्क्रीन यांचा वापर तर करावाच पण, सोबतच आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांचा अवलंब देखील करावा. व्यवस्थित काळजी घेतल्यास त्वचा, केस आणि श्वसन संस्थेचं आरोग्य दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतं.