मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीतील पाण्याने भरलेल्या खाणींमध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली. डाऊच खुर्द इथं राहणारे सार्थक गणपत बढे (वय 19 वर्ष), सुरेखा गणपत बढे (वय-18 वर्ष) या दोघा बहिण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
डाऊच खुर्द इथं राहणारे गणपत बढे यांची दोन्ही मुलं सार्थक आणि सुरेखा नेहमी जनावर चारायला घेऊन जात असतात. आज शनिवारी सुद्धा सार्थक आणि सुरेखा हे आपल्या घरातील जनावरं चारायला चांदेकसारे हद्दीतील खाणीच्या परिसरात गेले होते. त्या दरम्यान, खाणीमध्ये बुडून सार्थक आणि सुरेखाचा मृत्यू झाला. बराच वेळ झाला असता दोघेही घरी परतले नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. घरच्यांनी जेव्हा खाणीकडे जाऊन पाहणी केली असता सार्थक आणि सुरेखाचा मृतदेह पाण्यात आढळून आले.
advertisement
दोघांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती कोपरगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने बहिण भावाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दरम्यान, सार्थक आणि सुरेखाचा खाणीच्या पाण्यात बुडून कसा मृत्यू झाला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र, दोघा बहिण भावाच्या अकाली मृत्यूमुळे बडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
