मुलीचा बनाव करून 15 वर्षीय मुलाला फसवलं
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा अवघ्या 15 वर्षांचा असून तो दहावीचा विद्यार्थी आहे. आरोपींनी अत्यंत हुशारीने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावर मुलीचे नाव आणि फोटो वापरले आणि त्या माध्यमातून मुलाशी ओळख वाढवली.
सुरुवातीला साध्या गप्पांपासून सुरू झालेला संवाद हळूहळू अधिक भावनिक होत गेला. आरोपींनी स्वतःला मुलगी असल्याचे भासवत प्रेम व्यक्त केले आणि मुलाचा पूर्ण विश्वास संपादन केला. काही काळ नियमित चॅटिंग केल्यानंतर, त्या आरोपीने त्याला भेटण्याचा आग्रह धरला. विश्वासात आलेला मुलगा ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील नांदिवली परिसरात भेटण्यासाठी कॅबने गेला.
advertisement
मात्र तो ठिकाणी पोहोचताच चार तरुणांनी त्याला जबरदस्तीने पकडले आणि एका इमारतीतील खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर आरोपींनी मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधत तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. कुटुंबावर मानसिक दबाव टाकण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेज पाठवत धमक्याही दिल्या.
मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान मुलाला नांदिवली परिसरात सोडणाऱ्या कॅब चालकाचा शोध घेण्यात आला. मिळालेल्या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी एका संशयित खोलीवर छापा टाकला आणि मुलाची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासांत चारही आरोपींना अटक केली. घटनेनंतर पोलिसांनी पालकांना आणि तरुणांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
