सोलापूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचं एक खास कनेक्शन आहे. बाबासाहेबांनी अनेकदा सोलापूर शहर व जिल्ह्यात दौरा करून सभा घेतल्या. 14 जानेवारी 1946 रोजी सोलापुरात आल्यावर ते फॉरेस्ट येथील ‘गंगा निवास’मध्ये उतरले होते. त्यांच्या या भेटीत त्यांनी वापरलेल्या वस्तूंचा ठेवा आजही फॉरेस्ट येथील गंगा निवासात जपून ठेवले आहे. याबाबतच प्रकाश पसलेलू यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकदा सोलापूरला आले होते. 14 जानेवारी 1946 रोजी असेच एका कामासाठी बाबासाहेब सोलापुरात आले होते. यावेळी त्यांचे आदरातिथ्य करण्याचा मान हणमंतू सायण्णा गार्ड यांना मिळाला होता. त्यांनी त्यांच्या घरी म्हणजे गंगा निवास येथे बाबासाहेबांच्या राहण्याची सोय केली होती. गंगा निवाससारखे चांगले घर त्यावेळी आसपासही नव्हते, असं प्रकाश पसलेलू सांगतात.
बाबासाहेबांचे जंगी स्वागत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मद्रास मेलने सोलापुरात आले. समता सैनिक दलाच्या जवानांनी त्यांचे जंगी स्वागत केले. बाबासाहेबांना गंगा निवासमध्ये आणण्यासाठी हणमंतू गार्ड यांनी हिलमन कंपनीची कार आणली होती. या कारमध्ये बसून ते गंगा निवास येथे आले होते. याच ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. तसंच हे ठिकाण बाबासाहेबांना आवडलं देखील होतं.
गंगा निवासमध्ये बाबासाहेबांच्या आठवणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गंगा निवासामध्ये वापरलेल्या वस्तू आजही जपून ठेवल्या आहेत. तांब्या, फुलपात्र, चमचा, ताट, डायनिंग टेबल आदी वस्तूंचा यात समावेश आहे. बाबासोहबांनी गंगा निवासात वास्तव्य केल्याचा गार्ड कुटुंबीयांना अभिमान आहे. त्यामुळे त्यांनी आजही हा ठेवा जपून ठेवला आहे. सध्या या घरामध्ये हणमंतू गार्ड यांचे नातू प्रकाश पसलेलू हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत आहेत.