पळून जाऊन प्रेमविवाह केला
पोलिस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली असून, ही आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार आहे. अश्विनीने 16 जुलै 2025 रोजी पुण्यातील शिक्रापूर येथून अभिषेक बांगर याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या सुखाचा संसार दुःखात बदलला. प्रियकर आणि त्याच्या आईने अश्विनीला कामाच्या कारणावरून शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.
advertisement
स्वयंपाक येत नाही आणि कामं जमत नाही
हा छिन्नविच्छिन्न मृतदेह 29 जानेवारी 2026 रोजी एका शेतात आढळून आला होता. मृतदेहाचे डोके धडावेगळे झाले होते, मात्र तेथे सापडलेले कपडे आणि पायातील पैजण यावरून अश्विनीच्या वडिलांनी तिची ओळख पटवली. अश्विनी आणि अभिषेक हे माढा तालुक्यातील केवड येथील बबनदादा शिंदे साखर कारखान्यावर ऊस तोडीसाठी आले होते. तेथे तिला स्वयंपाक येत नाही आणि कामं जमत नाही, असं म्हणून सासरच्या मंडळींनी तिचं जगणं असह्य केलं होतं.
मृतदेह बैलगाडीत टाकला
या जाचाला कंटाळून अश्विनीने 13 जानेवारी 2026 च्या रात्री ओढणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवली. आपली चूक लपवण्यासाठी अभिषेक आणि त्याच्या आईने अत्यंत निर्दयीपणे अश्विनीचा मृतदेह बैलगाडीत टाकला आणि तुर्कपिपंरी शिवारात खड्डा खोदून तो पुरला. त्यांनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही दिवसांनी कुत्र्यांनी आणि इतर प्राण्यांनी तो खड्डा उकरल्यामुळे हे सर्व भयानक सत्य लोकांसमोर आले.
आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी
दरम्यान, या प्रकरणी अश्विनीचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बार्शी तालुका पोलिसांनी अभिषेक आणि त्याची आई सोजरबाई बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पळून जाऊन विवाह केल्यानंतर ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्यानेच अश्विनीचा विश्वासघात केला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
