यानंतर चार दिवसांनी दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. अधिकृतपणे दोन्ही देशांनी शस्त्र खाली ठेवली. पण अजूनही सीमेवरील तणाव कमी झाला नाही. पाकिस्तानकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. यामुळे भारतीय सैन्य दलाने सुट्टीवर गेलेल्या आपल्या सर्व सैनिकांना पुन्हा बोलावलं आहे. त्यामुळे कुणी स्वत:च्या लग्नासाठी, तर कुणी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. पण सर्वांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
अशात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एका जवानाला आपल्या मुलाचं लग्न अर्ध्यावर सोडून देशसेवेसाठी सीमेवर परतावं लागलं आहे. सैन्य दलाकडून त्यांना कर्तव्यावर परतण्याचा आदेश येताच ते तातडीने सीमेवर रवाना झाले आहेत. गजानन डाखोडे असं या जवानाचं नाव आहे. ते आपल्या मुलाच्या लग्नासाठी गावी आले होते. त्यांची सुट्टी २७ मे पर्यंत होती. मात्र भारत पाकिस्तानमधील तणावामुळे बॉर्डर वरील सर्व भारतीय सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मुलाच्या लग्नासाठी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान गजानन डाखोडे हे आपल्या मुलाचं लग्न अर्ध्यावर सोडून देश सेवेसाठी मार्गस्थ झाले आहेत. यावेळी कुटुंबीयांसह संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांना देश सेवेच्या शुभेच्छा दिल्या. गजानन डाखोडे सीमेवर जात असताना कुटुंबासह गावकऱ्यांचे डोळे पाणवले होते.
