गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये सातत्याने संघर्ष सुरू होता. दोन्ही पक्षांनी 'स्वबळाचा' नारा देत कार्यकर्त्यांना कामाला लावले होते. मतदारसंघाची बांधणीदेखील करण्यात आली. यासाठी आर्थिक ताकदही खर्ची झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, युतीमुळे हा सगळा खर्चा वाया जाण्याची भीती भाजपच्या गोटात व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणुकीत जागा वाटपासाठी मागील निवडणुकीत विजयी जागा त्याच पक्षाला सोडण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई महापालिका जागा वाटपात भाजपकडून अधिक जागांवर दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून ठाण्यात मुंबईतील कोंडीला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
advertisement
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने ‘स्वबळ’चा नारा देत निवडणूक लढवली आणि नगरसेवकांची संख्या २३ पर्यंत वाढवली होती. त्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिल्याचे आरोप भाजपमधूनच झाले होते. निवडणुकीनंतर युती झाल्यानंतरही भाजपच्या नगरसेवकांना अपेक्षित ताकद देण्यात आली नाही, अशी तक्रार सातत्याने करण्यात आली. यामुळे ठाण्यात पक्षवाढ खुंटल्याचा दावा भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
२०१९ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर भाजप विरोधी पक्षात गेल्यावर ठाण्यात संघटन वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आले. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये गणेश नाईक यांना वनमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत पुन्हा स्वबळाचा नारा दिला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील यशानंतर भाजपने प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांना कामाला लावले. मात्र, शिवसेनेतील फूटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची संख्या ६८ वरून थेट ८५ पर्यंत वाढवली. विरोधी पक्षातील अनेक दिग्गज माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याने, युती झाल्यास भाजपला संधी फारच मर्यादित राहतील, याची जाणीव स्थानिक नेतृत्वाला झाली आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ‘यावेळी १०० पार’चा नारा दिल्याने भाजपच्या वाढीची शक्यता आणखी धूसर झाली आहे.
सध्याच्या जागावाटपाच्या गणितानुसार युती झाल्यास भाजपला केवळ ३० ते ४० जागांवरच समाधान मानावे लागेल. ‘ज्या पक्षाने जागा जिंकली ती जागा त्याच पक्षाला’ हा फॉर्म्युला लागू झाल्यास भाजपच्या विद्यमान २३ जागा जवळपास निश्चित मानल्या जात आहेत. उर्वरित १० ते १५ जागा तुलनेने कमजोर प्रभागांमध्ये मिळण्याची शक्यता असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. १३१ पैकी केवळ ३० ते ४० जागा मिळाल्यास सुमारे १०० प्रभागांमध्ये भाजपचे अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
