बजरंग चौकातील 'सीसीटीव्ही'त कैद झाला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, स्पोर्ट्स बाईकच्या व्यवहारावरून आरोपी आणि पीडित विद्यार्थी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. शुक्रवारी मध्यरात्री पीडित विद्यार्थी बजरंग चौक परिसरात असताना, दोन कारमधून आलेल्या ७ जणांच्या टोळीने त्याला गाठले. काही कळायच्या आतच त्याला जबरदस्तीने कारमध्ये कोंबून आरोपींनी तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
पोलिसांचा 'सिनेस्टाईल' पाठलाग
घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले. कंट्रोल रूमला माहिती देऊन शहरातील सर्व नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या कारचा माग काढत वाळूज परिसरापर्यंत सिनेस्टाईल पाठलाग केला. अखेर दोन तासांच्या आत पोलिसांनी मुलाची सुखरूप सुटका केली आणि तिघांच्या मुसक्या आवळल्या.
तिघांना पोलीस कोठडी, चार जण अद्याप फरार
या प्रकरणी पोलिसांनी विवेक गणेश सोनवणे, पांडुरंग माधवराव सोनवणे आणि रोहन सुनील ढवळे या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात सामील असलेले इतर चार आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
