अजित पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक वारशाची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. सातारा दौऱ्यात त्या अजितदादांच्या अत्यंत श्रद्धेच्या स्थानी म्हणजेच कराडच्या प्रीतीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.
यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वसा
अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे विचार केंद्रस्थानी होते. आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर दादा कराडच्या प्रीतीसंगमावर नतमस्तक होत असे. मोठा राजकीय निर्णय असेल किंवा एखाद्या कृती, वक्तव्याबाबत खेद व्यक्त करण्यासाठी अजित पवार हे प्रीतीसंगम येथे येत असे.
advertisement
आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही त्याच परंपरेचे पालन करत सकाळी १० वाजता कराडमध्ये दाखल होऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. "आमचे राजकारण आणि समाजकारण हे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचेच आहे," हा अजितदादांचा संदेश सुनेत्रा वहिनी या दौऱ्याच्या निमित्ताने अधोरेखित करत आहेत.
विदीप जाधवांच्या कुटुंबीयांची घेणार भेट...
कराडचा कार्यक्रम आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार फलटणमधील लोणंद मधील तरडगावकडे रवाना होतील. दुपारी १ वाजता त्या दिवंगत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. विदीप जाधव हे मुंबई पोलिसांच्या सेवेत होते. अजितदादांचे ते सुरक्षा रक्षक होते. विमान अपघातात त्यांचेही निधन झाले. आपल्या पतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असलेल्या या सहकाऱ्याच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी सुनेत्रा पवार ही भेट घेणार आहेत.
कालच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच आज सुनेत्रा पवार जाधव कुटुंबाचे सात्वंन करणार आहेत.
