संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर नुकतेच चेअरमन म्हणून दिवंगत अजित पवार यांनी सूत्रे हाती घेतली होती. परंतु 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या कारखान्याची चेअरमन पदाची जागा रिक्त झाली होती.
या संदर्भात उद्या बुधवारी माळेगाव कारखान्याच्या सभागृहामध्ये सर्व संचालकांची बैठक होणार असून या बैठकीला नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. बारामतीच्या सहयोग सोसायटीमध्ये सर्व संचालकांची बैठक झाली या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारावी असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उद्या ब वर्ग सोसायटी मधून अर्ज भरून घेऊन नंतर त्यांची चेअरमनपदी निवड केली जाणार आहे.
advertisement
अजितदादांनी जिंकली होती माळेगावची निवडणूक
बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या पंचवार्षिक निवडणूक मागील वर्षी २४ जून २०२५ रोजी पार पडली होती. राष्ट्रवादीचे दिवगंत नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत अजित पवार यांच्या 'श्री निळकंठेश्वर पॅनेल' आणि चंद्रराव तावरे यांचे 'सहकार बचाव शेतकरी पॅनेल' यांच्यात लढत झाली होती. एकूण २१ जागांपैकी अजित पवार गटाच्या श्री निळकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवला होता. तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनेलल फक्त ०१ जागेवर चंद्रराव तावरे स्वतः निवडून आले होते. तर शरद पवार गटााच्या बळीराजा पॅनेलला एकही जागा जिंकता आली नव्हती. अजितदादांनी स्वत: चेअरमनपदाची धुरा स्वीकारली होती.
