सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता शिवसेना निवडणूक चिन्ह आणि पक्ष कोणाचा यावरील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.
आज सुनावणी का नाही?
सरन्यायाधीश सूर्य कांत आज केवळ दुपारी 1 वाजेपर्यंतच नियमित कामकाज पाहणार आहेत. त्यानंतर सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्यासह ‘अरवली डोंगररांगा’ प्रकरणाच्या विशेष सुनावणीत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित प्रकरणांना पुरेसा वेळ मिळणे अवघड असल्याचे चित्र आहे. शिवसेना निवडणूक चिन्ह आणि पक्षाबाबतची सुनावणी ही आजच्या कामकाजाच्या यादीत ३७ व्या क्रमांकावर होती. त्यामुळे आज सुनावणी होणे अशक्य असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी तीन-तीन तासांचा वेळ दिला आहे. या वेळेत दोन्ही बाजूच्या वकिलांना युक्तिवाद करावा लागणार आहे.
advertisement
गेल्या अनेक महिन्यांपासून तारीख पे तारीख मिळत असल्याने राजकीय वर्तुळात अस्वस्थता होती. मात्र, आता पुढे होणारी ही सुनावणी 'अंतिम' आणि 'निर्णायक' असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निकालावर राज्यातील आगामी निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असल्याने दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे.
