स्वस्थ नारी, सशक्त परिवार आरोग्य अभियान नेमकं काय?
'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या विशेष आरोग्य अभियानांतर्गत महिला व बालकांच्या आरोग्यावर भर दिला जाणार आहे. शिबिरांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (तोंड, स्तन व गर्भाशय ग्रीवा), क्षयरोग, सिकल सेल, अॅनिमिया तपासणी करण्यात येणार आहे. किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती, गर्भवतींची प्रसूतिपूर्व काळजी तसेच बालकांचं लसीकरण या सेवाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक व शहरी आरोग्य केंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही शिबिरे होणार आहेत. खासगी रुग्णालये व दवाखानेदेखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
advertisement
17 सप्टेंबरपासून आरोग्य अभियान, तज्ज्ञ डॉक्टरांची साथ
या मोहिमेसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, दंततज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्या सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार प्रत्येक उपकेंद्र व शहरी आरोग्य केंद्रात आठवड्यातून दोन शिबिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून एक शिबिर, तर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत रक्तदान व अवयवदानासह किमान दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत.
जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांत पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शिबिरे पार पडतील. तसेच 2 ऑक्टोबर रोजी विशेष संदर्भ सेवा शिबिराचं आयोजन होणार असून, संपूर्ण अभियानासाठी विविध स्तरांवर समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.