धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल अधिकारी पंचनामा करताना चालढकल करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी तानाजी सावंत यांच्याकडे केल्या होत्या. सावंत गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघातून गायब आहेत. तब्येतीच्या कारणास्तव सध्या ते मतदारसंघात फिरत नसल्याचे सांगितले जाते.
अशातच माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा एक व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांनी परंडा तहसीलदार यांना फोन करत नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, असे आदेश देतानाच शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी येता कामा नये, असे स्पष्ट बजावले आहे.
advertisement
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी तहसीलदारांना केलेला कॉल समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला असून तानाजी सावंत हे त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे गेले अनेक दिवसांपासून मतदार संघात आलेले नाहीत, असे सांगितले जाते. तानाजी सावंत यांना जनतेची एवढीच काळजी आहे तर ते मतदारसंघात फिरून झालेल्या नुकसानाची पाहणी का करीत नाहीत असा सवाल विरोधक विचारीत आहेत. तर तब्येतीच्या कारणास्तव त्यांना फिरण्यास अडचणी येत असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदारांना सूचना केल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.