राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज शिवाजी सावंत यांनी माढा तालुक्यातील मानेगाव गटातून जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे गेल्या तीन महिन्यापासून भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत.
मात्र, तानाजी सावंत यांच्यामुळे शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश रखडला गेला. सरतेशेवटी पक्ष प्रवेशाविनाच तानाजी सावंत यांच्या पुतण्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि त्यांच्या परिवाराने आज भाजपचा झेंडा हातात घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करत जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाजी सावंत यांच्या कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तानाजी सावंत यांना धक्का मानला जात आहे.
advertisement
सावंत बंधूतील राजकीय वाद चव्हाट्यावर
दर्यान, तानाजी सावंतांनी मुख्यमंत्र्यांना सांगून माझा भाजप प्रवेश रोखला, असल्याचा खळबळजनक दावाच शिवाजी सावंत यांनी केला होता. गेल्या तीन महिन्यापासून शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश रखडला आहे.
पण, आपले बंधू असणारे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीच मुख्यमंत्र्यांना सांगून आपला भाजप प्रवेश रोखला, असा आरोपाच शिवाजीराव सावंत यांनी केला होता. त्यामुळे माढा तालुक्यातून आता सावंत बंधूंचा राजकीय वाद चव्हाट्यावर आला होता. शिवाजी सावंत यांनी शिवसेना संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा देऊन भाजप प्रवेशाची तयारी केली. मुंबईमध्ये प्रवेशाचे दोन वेळा मुहूर्तही ठरला होता. मात्र सावंत यांचा प्रवेश केल्या दोन ते तीन महिन्यापासून रखडत आहे. पण, आता भाजपने उमेदवारी देऊन सावंत यांना शह दिला आहे.
