वडोदऱ्यातील समन्वय प्रतिष्ठानच्या पुढाकाराने व इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून निवडलेल्या 51 समाजपरिवर्तकांचा या भव्य सोहळ्यात गौरव करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील तेजस घाडगे यांचा समावेश होता.
advertisement
कोण आहेत तेजस घाडगे?
पंढरपूर येथील तेजस हे गेल्या 15 वर्षांहून अधिक काळापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. प्रभा हिरा प्रतिष्ठान'च्या संस्थापिका मंगलताई शहा व सहसंस्थापक डिंपल घाडगे यांची तिसरी पिढी म्हणून त्यांनी सामाजिक कार्याची धुरा सांभाळली आहे. आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करणे, युवकांमध्ये जनजागृती करणे व पालवी प्रकल्पाचं कार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यात तेजस यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
मेडिकल व सायकॅट्रिक सोशल वर्क या शाखेत मास्टर्स शिक्षण घेतलेल्या तेजस यांनी समुपदेशन, जनसंपर्क, निधी उभारणी व प्रकल्प नेतृत्व या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तेजस म्हणाले, "हा पुरस्कार फक्त माझा नाही, तर कित्येक पिढ्यांपासून पालवीच्या चालत आलेल्या सेवाभावाचा गौरव आहे. एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलं आणि महिलांसाठी झालेल्या 25 वर्षांच्या अविरत कार्याचा हा सन्मान आहे. महाराष्ट्रासाठी, पंढरपूरसाठी आणि सर्व हितचिंतक-देणगीदारांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे."
'प्रभा हिरा प्रतिष्ठान'च्या पालवी प्रकल्पाअंतर्गत एचआयव्हीग्रस्त अनाथ बालकं आणि महिलांच्या संगोपनासाठी कार्यरत आहे. गेल्या 25 वर्षांपासून या संस्थेने अनेकांना आधार, आसरा, शिक्षण आणि स्वावलंबनाचे धडे दिले आहेत.