दुरुस्तीचा खर्च कोणाचा?
भाडेकरू घर सोडताना दुरुस्तीचा मुद्दा पुढे येतो. मात्र, कायद्यानुसार सामान्य वापरामुळे होणाऱ्या झिजेसाठी भाडेकरू जबाबदार नसतो. उदाहरणार्थ, भिंतींचा रंग फिका होणे, लहान डाग पडणे किंवा दैनंदिन वापरामुळे होणारी किरकोळ झीज ही घरमालकानेच दुरुस्त करणे अपेक्षित असते. त्यामुळे अशा खर्चाची जबाबदारी भाडेकरूवर टाकता येत नाही.
भाडेकरू कधी जबाबदार?
advertisement
भाडेकरूच्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे मोठे नुकसान झाल्यास मात्र परिस्थिती वेगळी असते. भिंती तोडणे, दरवाजे-खिडक्यांचे नुकसान करणे, फिटिंग्ज खराब करणे किंवा घराच्या रचनेत बदल करणे यासाठी भाडेकरू जबाबदार धरला जातो. अशा वेळी दुरुस्तीचा खर्च भाडेकरूकडून वसूल करण्याचा अधिकार घरमालकाला असतो.
कायदा काय सांगतो?
देशातील विविध राज्यांमध्ये भाडेविषयक कायदे वेगवेगळे असले तरी ‘आदर्श भाडेकरू कायदा 2021’मध्ये याबाबत मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. भाडेकरूने घर ज्या स्थितीत घेतले, त्याच स्थितीत परत करणे अपेक्षित असते. मात्र, यामध्ये सामान्य झीज आणि वापरामुळे होणारे बदल समाविष्ट होत नाहीत. मालमत्तेच्या स्थितीबाबत वाद निर्माण झाल्यास अंतिम निर्णय न्यायालयाकडूनच घेतला जातो.
वाद टाळण्यासाठी काय करावे?
भाडेकरार करताना सर्व अटी स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. घर ताब्यात घेताना त्याची स्थिती लेखी स्वरूपात नोंदवून ठेवावी. तसेच, घर सोडताना आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे तयार ठेवावेत. घरमालकाला विनाकारण संपूर्ण अनामत रक्कम रोखून ठेवण्याचा अधिकार नसतो, तर भाडेकरूनेही घराचा योग्य वापर करून नुकसान टाळण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.
