पिंपरी-चिंचवड शहरात प्राण्यांच्या मदतीसाठी एक प्रेरणादायी उपक्रम सुरू झाला आहे. समाजसेविका अनिता अग्रवाल यांनी प्राण्यांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. शहरात जखमी किंवा आजारी प्राण्यांना तातडीने उपचार मिळावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सेवेमुळे अनेक जखमी प्राण्यांचे प्राण वाचत असून नागरिकांकडूनही या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
advertisement
Youtube वर पहिला Video अन् सुचली आयडिया, नोकरी करत उभारला मोरिंगा पावडर व्यवसाय, ऋतुजा यांची कहाणी
प्राण्यांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा
अपघातग्रस्त आणि आजारी प्राण्यांवर उपचारांसाठी अनिता यांनी स्वतंत्र मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. माणसांसाठी काम करणारे अनेक लोक आणि संस्था आहेत, पण प्राण्यांसाठी काम करणारे फार कमी आहेत. त्यामुळे जखमी प्राण्यांना लवकर मदत मिळावी म्हणून ही सेवा सुरू केली, असे अनिता अग्रवाल यांनी सांगितले.
हजारो प्राण्यांना जीवदान
या ॲम्ब्युलन्स सेवेमुळे आतापर्यंत हजारो जखमी आणि आजारी प्राण्यांना मदत करण्यात आली आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येते. या सेवेमुळे शहरातील अनेक प्राण्यांचे प्राण वाचले असून नागरिकांकडूनही मदत आणि सहकार्य मिळत आहे.
कार ऐवजी घेतली ॲम्ब्युलन्स
या उपक्रमासाठी अनिता अग्रवाल यांनी वैयक्तिक त्यागही केला आहे. त्यांनी नवीन कार खरेदी करण्याचा विचार सोडून त्याऐवजी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या **लोहगाव**, पिंपरी-चिंचवड, कात्रज आणि वाकड या परिसरातून कॉल आल्यास त्यांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचते. त्यांच्या सोबत सध्या 8 ते 9 जणांची टीम कार्यरत आहे.
नववीपर्यंत शिक्षण
अनिता अग्रवाल यांनी ‘आधार फाउंडेशन’ची स्थापना करून गेली चार वर्षे या माध्यमातूनही समाजसेवा सुरू ठेवली आहे. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे त्यांचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झाले असले, तरीही समाजासाठी काम करण्याची त्यांची जिद्द आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्राण्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची भावना यामुळे हा उपक्रम शहरात एक आदर्श ठरत आहे. भविष्यात ही सेवा आणखी व्यापक करण्याचा त्यांचा मानस असून अधिकाधिक प्राण्यांना मदत करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. अनिता अग्रवाल यांनी **भूतदयेचा** अनोखा आदर्श निर्माण केला आहे.





