डोंबिवली: कल्याणमधील आजमेरा हाईट्स सोसायटीमध्ये परप्रांतीय व्यक्तीने मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमतट असून राज्याचं राजकारणदेखील तापू लागलं आहे. परप्रांतीय आणि मराठी माणसांतील संघर्षाच्या पोस्ट, व्हिडीओ आणि मिम्स देखील सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. पण सगळीकडेच ही वस्तूस्थिती आहे का? हे पाहण्यासाठी लोकल18 ने दिव्यातील एका सोसायटीत जाऊन माहिती घेतली. यावेळी वेगळीच स्थिती पाहायला मिळाली.
advertisement
ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक सोसायटीत मराठी आणि अमराठी कुटुंबे एकत्र राहतात. ठाण्यातील दिवा शहरात असणाऱ्या सूरज अपार्टमेंटमध्ये देखील गेल्या 2 दशकांपासून काही परप्रांतीय कुटुंबे राहत आहेत. मराठी आणि अमराठी कुटुंबांमध्ये इथले संबंध अगदी घरगुती स्वरुपाचे आहेत. आम्ही गेल्या 15-20 वर्षांपासून एकत्र राहतोय, पण कल्याणमधील प्रकार पाहून वाईट वाटल्याचे इथले रहिवासी सांगतात.
सण-उत्सव एकत्र साजरे करतो
“आम्ही या सोसायटीमध्ये गेले पंधरा वर्षे राहत आहोत. यामध्ये अगदी हिंदी भाषिक, बंगाली, मराठी असे सगळे मिळून मिसळून राहतो. आमचे सणसमारंभ सुद्धा आम्ही एकत्र मिळून साजरे करतो. याची सुरुवात 26 जानेवारीला होते. हा दिवस आम्ही सर्व सोसायटीतले सदस्य एकत्र येऊन साजरा करतो,” असे सोसायटीतले रहिवाशी सचिन गोताडे यांनी सांगितले.
गणेशोत्सव साजरा करतो
“मी स्वतः उत्तर भारतीय आहे. सोसायटीत इतके सदस्य आहेत. कधी कोणाचं तरी भांडण होतंच. पण नंतर ते भांडण आम्ही आपली माणसं समजून मिटवतो सुद्धा. माझ्या घरी मी उत्तर भारतीय असून सुद्धा गणपती बाप्पा बसतो आणि या सोसायटीतले सगळी मराठी मंडळी आवर्जून आरतीसाठी येतात. तेव्हा हे सगळे मराठीत आरती बोलतात आणि मलाही ते फार आवडतं,” असे मनीष सिंग ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, कल्याण सारख्या घटना घडल्या की मनाला फार वाईट वाटतं. आमच्या इतर सोसायटीतल्या लोकांचा अभिमान सुद्धा वाटतो की आम्ही कधीच असा भेदभाव केला नाही. माणसासाठी माणूस महत्त्वाचा असतो. त्याची भाषा किंवा जात नव्हे, असे मत सोसायटीतल्या रहिवाशांनी व्यक्त केले.