महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ट्री टॉप वॉक' नागरिकांसाठी खुला केल्यानंतर मार्च ते जुलैदरम्यान 1 लाख 96 हजार 190 पर्यटकांनी भेट दिली. विशेष म्हणजे यामध्ये 880 विदेशी पर्यटकांचाही समावेश होता. मे आणि एप्रिल या महिन्यात पर्यटकांची संख्या प्रत्येकी 50 हजारांच्यावर होती.
advertisement
सिंगापूरमधील 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा प्रकल्प मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या डी विभागांतर्गत असलेल्या फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान याठिकाणी हा प्रकल्प आहे. या मार्गाची लांबी 485 मीटर आणि रुंदी 2.4 मीटर आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचं अथांग रूप न्याहाळण्यासाठी 'सी व्हीविंग डेक'देखील बांधण्यात आला आहे.
मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या 100 हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधीही याठिकाणी मिळत आहे. 'ट्री टॉप वॉक' ला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये, तर विदेशी पर्यटकांसाठी 100 रुपये तिकीट आकारलं जात आहे.
'ट्री टॉप वॉक' येथे एका वेळी 200 जणांना प्रवेश दिला जातो. ही सुविधा पहाटे 5 ते रात्री 9पर्यंत उपलब्ध असते. https://naturetrail.mcgm.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट काढण्याचा पर्याय देण्यात आला आहे.