मानवी देह त्यागाची एक प्राचीन प्रथा म्हणजे संजीवन समाधी होय. अत्यंत कमी योगी लोकांना साध्य करता येणारी ही संकल्पना समजली जाते. यापैकीच सांगलीच्या कडेगाव तालुक्यात हिंगणगाव बुद्रुक इथं नारायण स्वामी महाराज यांची संजीवन समाधी आजही पहायला मिळते. 12व्या शतकातील संजीवन समाधी विषयी अधिक जाणून घेऊ.
नारायण स्वामी महाराजांच्या समाधी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी 'लोकल 18'च्या प्रतिनिधींनी हिंगणगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी हिंगणगावचे ज्येष्ठ नागरिक ह.भ.प.जनार्दन कदम यांनी नारायण स्वामी महाराज यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. सागंली जिल्ह्यातील "कडेगाव" तालुक्यातील हिंगणगाव ब्रुद्रुक हे नारायण स्वामी महाराजांच्या संजीवन समाधी मुळे ओळखले जाते.
advertisement
नारायण स्वामींचा जन्म ब्राम्हण समाजातील गोपाळपंत क्षीरसागर यांचे घरी काशीबाईच्या पोटी झाला. गोपाळपंत आपला उदरनिर्वाह गावात फिरुन पचांग सांगून करत असे. नारायण स्वामी लहाणपणापासून शंकराची भक्ती करत होते. स्वामी रोज रात्री 12 वाजता उठुन "नांदणी" नदीमध्ये स्नान करून ते गिरजोबाची वाडीला पायी चालत जात असत. तेथील श्री गिरजाशंकराला पाणी घालुन पहाटे ते हिंगणगावला परत येत असत. असा त्यांचा नित्यक्रम होता.
गिरजोबाची वाडी हे हिंगणगाव पासून उत्तरेकडे राजाचे कुर्ले गावाजवळ सुमारे अकरा किलोमीटर दुर आहे. स्वामींच्या भक्तीला एक तप पुर्ण झाल्यावर गिरजाशंकर त्यांना प्रसन्न झाले. स्वामींना म्हणाले तुला जे मागायचे आहे, ते माग. ते मी द्यायला तयार आहे. स्वामी विचार करुन म्हणाले आपण माझ्याबरोबर माझ्या गावी हिंगणगांवी यावे म्हणजे आपले दररोज दर्शन होईल आणि आपली सेवा करण्याचे भाग्य मला मिळेल. गिरजाशंकरानी स्वामींना वचन दिले. पण एक अट दिली ती कबुल असेल तर मी तुझ्या गावी येतो.
अट अशी की 'तु पुढे चल मी तुझ्या मागे येतो. पण तु मागे वळुन पाहिलेस तर मी त्याच ठिकाणी गुप्त होईन.' ती अट स्वामींनी मान्य केली. स्वामी पुढे चालु लागले आणि श्री गिरजाशंकर त्यांच्या मागे चालु लागले. हिंगणगांवजवळील बेलबनापाशी आल्यावर स्वामींना शंका निर्माण झाली की श्री गिरजाशंकर आपले पाठीमागे आले की नाहीत? म्हणून स्वामींनी मागे वळुन पाहीले, त्याच बरोबर श्री गिरजाशंकर त्या ठिकाणी बेलबनात गुप्त झाले. त्या ठिकाणाला बेलबन म्हणतात. आज त्या ठिकाणी श्री शंकराची पिंड असलेले देऊळ पहावयास मिळते.
गुरूंच्या परवानगीने घेतली समाधी
जयराम स्वामींचे वडगाव येथील कृष्णत स्वामी हे गुरू होते. स्वामींनी गुरूंची परवानगी घेऊन संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. हिंगणगावी परत आल्यावर त्यांनी सर्व गोत्रास आणि गावातील लोकांना बोलावून त्यांच्यापुढे संजीवन समाधी घेणार आहे असा विचार प्रकट केला. गावातील लोकांनी आणि गोत्रातील लोकांनी मिळुन विचार करुन एक हेमाडपंथी देऊळ बाधुंन व भुयार काढून दिले. आत जाण्यासाठी एक रस्ता सुद्धा करुन दिला. नारायण स्वामी महाराजांनी इ.स. 1210 साली, मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी गुरुवार या दिवशी संजीवन समाधी घेतली.
जाईची वेल जिवंतपणाची साक्ष
स्वामींनी हेमाडपंथी देवळाच्या वरतीमाथ्यावर एक जाईचा वेल लावला आहे. जाईची वेल केवळ दगडावर लावलेली आहे. ती वेल स्वामींच्या जिवंत पणाची साक्ष मानली जाते. येथील जाईच्या वेलीस आज सुमारे 814 वर्ष पुर्ण झाली आहेत. आजही जाईची वेल बाराही महिने फुलांनी बहरलेली दिसते. या जाईचा उल्लेख "जयराम स्वामींचे वडगांव" या बखरीत लिहिला आहे. नारायण स्वामी संजीवन समाधी विषयी अधिक जाणून घेताना हिंगणगावचे जेष्ठ नागरिक बबन गायकवाड यांनी बऱ्याच आश्चर्यकारक आख्यायिका सांगितल्या. त्यापैकी शापित समाजाचा किस्सा देखील आहे.
नारायण स्वामींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सहा महिन्यांनी गावातील ब्राह्मण समाजातील काही लोकांनी स्वामी खरोखरच आत आहेत का? हे पाहण्यासाठी स्वामी ज्या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते, तेथील वरची शिळा हलवून पाहण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मण समाजाने अविश्वासाने केलेले हे कृत्य नारायण स्वामींना आवडले नाही. तेव्हा त्यांनी "एक काठ येरळेचा अन् दोन काठ नांदणीचे या भागात ब्राह्मणांचा वंश वाढणार नाही!" असा शाप दिला होता. या शापाची प्रचिती आजही हिंगणगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांना येत असून या गावामध्ये ब्राह्मण समाज उरला नाही. तसेच वतनावर आलेल्या ब्राह्मणांची देखील या गावात वंशवृद्धी होत नसल्याचे गावकरी सांगतात. तसेच गावामध्ये ब्राह्मण नसल्याने अनेक धार्मिक विधींसाठी परगावचा ब्राह्मण बोलावला जातो. गावातील मंदिरांमध्ये पुजेसाठी गुरव समाज नेमला आहे.
आजवर झाले 814 संजीवन समाधी सोहळे
हिंगणगाव बुद्रुक येथील नारायण स्वामींचा संजीवन समाधी सोहळा मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचन, भजन, कीर्तन आणि प्रवचन यांसारखे धार्मिक कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात. तसेच प्रत्येक पौर्णिमेला गावकरी भोजनाचा प्रसादाचे आयोजन करतात. गाव आणि परिसरातील लोकांची श्रद्धा असल्याने हे एक धार्मिक केंद्र बनले आहे.
"प्रति आळंदी" म्हणून ओळख
संजीवन समाधी म्हटलं की प्रत्येकाला आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आठवते. आळंदी येथील संजीवन समाधी प्रमाणेच हिंगणगावच्या नारायण स्वामींच्या समाधीचे स्थान आहे. आळंदी प्रमाणेच सिद्धेश्वराचे मंदिर, मागील बाजूस नांदणी नदी, भव्य असा पिंपळाचा वृक्ष आणि हेमाडपंथी मंदिर असे समाधीचे निसर्ग रम्य स्थान आहे. निसर्गरम्य आणि शांत वातावरणाने नारायण स्वामी संजीवन समाधी परिसरामध्ये चैतन्य जाणवत असल्याचे मानले जाते.