नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुली दररोजप्रमाणे सायंकाळी असलेल्या ट्युशन क्लाससाठी घरून निघाल्या होत्या. मात्र, त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. पालकांनी त्यांचा शोध सुरू केला असता, त्या कोठेही आढळून आल्या नाहीत.
या घटनेच्या काही वेळापूर्वीच, ट्युशनच्या शिक्षिकेने मुलींच्या घरी निरोप पाठवला होता की, "तुमची मुलगी वर्गात खूप बडबड करते, त्यामुळे पालकांनी एकदा भेटायला यावं." यानंतर या तिन्ही मुलींना शिक्षेची भीती वाटत असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.
advertisement
मैत्रिणींकडून महत्त्वपूर्ण माहिती
या तिन्ही मुलींच्या काही मैत्रिणींनी पालकांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या तिन्ही बेपत्ता मुली पालकांकडे तक्रार केल्यानंतर , "आता आमचं काही खरं नाही," असं म्हणत रडत होत्या. त्यानंतर त्या नांदुरा शहराच्या दिशेने जाणाऱ्या एस. टी. बसमध्ये बसून निघून गेल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
या माहितीनंतर जळगाव जामोद पोलिसांसमोर या मुलींचे अपहरण झाले आहे की त्या स्वतःहून कुठे निघून गेल्या आहेत, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पालकांनी तातडीने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तिन्ही मुलींचा तातडीने शोध सुरू केला असून, एसटी बसमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारावर कसून तपास केला जात आहे.
