योजनेचा उद्देश काय?
‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’ ही राज्यातील आदिवासी समाजातील महिलांना आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, प्रशासन, उद्योग आणि स्वयंरोजगार या क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि समाजात नेतृत्व निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
advertisement
कोणत्या योजनांसाठी मिळेल अनुदान?
या योजनेअंतर्गत महिलांना विविध वैयक्तिक आणि सामूहिक प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. जसे की,
वैयक्तिक योजना
कपडे विक्री किट, शेळी-मेंढी वाटप, गाय-म्हैस खरेदी, कुक्कुटपालन
कृषी पंप खरेदी, शिलाई मशीन, चहा स्टॉल, ब्युटी पार्लर साहित्य, भाजीपाला स्टॉल, पत्रावळी बनविण्याचे यंत्र
सामूहिक योजना
मसाला कांडप यंत्र, आटाचक्की, शुद्ध पेयजल युनिट, बेकरी उत्पादन केंद्र. या सर्व प्रकल्पांसाठी महिलांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे गावोगावी लघुउद्योग निर्माण होऊन स्थानिक रोजगार वाढेल अशी अपेक्षा आहे.
अर्थसहाय्य किती मिळणार?
नवीन शासन निर्णयानुसार, वैयक्तिक व्यवसायांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे १०० टक्के अनुदान तर सामूहिक योजनांसाठी (बचत गट किंवा महिला गट) यांना ७.५ लाख रुपयांपर्यंतचे १०० टक्के अनुदान मिळणार आहे. यापूर्वी आवश्यक असलेला १५ टक्के लाभार्थी हिस्सा आता पूर्णपणे रद्द झाल्याने, महिलांना आर्थिक गुंतवणुकीचा भार उरणार नाही. यामुळे अनेक आदिवासी महिला प्रथमच स्वतःचा उद्योग सुरू करण्यास पुढे येतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ‘एनबीट्रायबल’ (NBTribal) या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्या लॉगिनवर हे अर्ज प्राप्त होतील आणि पुढील कार्यवाही तिथून केली जाईल.
