देवस्थान प्रशासनात असलेल्या अनियमितता, बनावट ॲप, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार या कारणामुळे शनैश्वर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. आता शनैश्वर विश्वस्त मंडळाच्या जागी असणार जिल्हाधिकारी प्रशासक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिराच्या स्थावर मालमत्तेसह भाविकांच्या सोयी सुविधांची जबाबदारी प्रशासक असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.
अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती
advertisement
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही समिती स्थापन होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे समिती स्थापन होईपर्यंत अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
500 कोटींचा घोटाळ्याचा आरोप
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या शनि मंदिरातील घोटाळ्यांबद्दलची लक्षवेधी सूचना स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी मांडली होती. या ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप तयार करून लाखो भक्तांकडून त्यावर पुजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या. असे तीन-चार बनावट ॲप होते आणि प्रत्येक ॲपवर तीन ते चार लाख भक्तांनी पैसे पाठविले. या शिवाय बोगस भरतीवरही त्यांनी प्रकाश टाकला. एकूण घोटाळा 100 कोटींचा असल्याचे ते म्हणाले. भाजपचे सुरेश धस यांनी हा घोटाळा 500 कोटींचा असून ट्रस्टचे विश्वस्त दर आठवड्याला दहा-दहा कोटी रुपयांच्या जमिनी घेत आहेत, असा हल्लाबोल केला होता. तसेच श्री शनि देवाच्या चौथऱ्यावरून आणि देवस्थानातील हिंदू व मुस्लिम वादामुळे कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.