तुळजापूर येथील तुळजाभवानी विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात मोठा वाद उद्भवला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्रग्स प्रकरणातील कथित मास्टरमाईंड विनोद पिंटू गंगणे याचा सार्वजनिकरित्या सत्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमात उपस्थित भाजप आमदार राणा पाटील यांच्या हस्ते निधी मिळवून देण्याबाबतचा गौरव करण्यात आला. मात्र, त्याच कार्यक्रमात ड्रग्स प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे याला शाल-श्रीफळ देऊन सन्मानित केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी बावनकुळे यांनी गंगणेचे कौतुक करत त्याच्या कार्याचा उल्लेख केला.
advertisement
कार्यक्रमानंतर माध्यमांनी या वादग्रस्त प्रकाराबाबत प्रश्न विचारल्यावर महसूल मंत्र्यांनी उत्तर देण्यास नकार देत “मी सकाळी बोलेन” असे सांगत गडबडीने निघून गेले. त्यानंतर त्यांनी आमदार राणा पाटील बोलतील असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
आमदार राणा पाटील काय म्हणाले?
पत्रकारांकडून प्रश्नांच्या फैऱ्या वाढल्यानंतर आमदार राणा पाटील यांनी आपण सकाळी बोलूयात, पोलिसांचे प्रतिज्ञापत्र वाचा असे हसत हसत सांगितले. तुळजापूर ड्रग्स प्रकरणात विनोद गंगणेचे नाव प्रमुख सूत्रधार म्हणून घेतले गेले होते. त्यामुळे अशा व्यक्तीचा महसूल मंत्र्यांनी सत्कार केल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
फेब्रुवारी महिन्यात तुळजापूरमध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी सुरुवातीला तिघांना अटक केली. संबंधित तिघांची चौकशी केली असता, या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील व्यापकता समोर आली होती. पोलिसांनी मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं. यात एक दोन नव्हे तर तब्बल ३६ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती.
