सातारा : सातारा तालुक्यात जिल्हा परिषदचे आठ गट, तर पंचायत समितीचे 16 गण आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेही भारतीय जनता पक्षात आहेत, त्यामुळे येथील कार्यकर्त्यांचे लक्ष नेत्यांच्या भूमिकेकडे आहे. नेत्यांनी मनोमिलनाच्या माध्यमातून भाजपच्या चिन्हावर लढायचे ठरविले, तर निम्म्या निम्म्या गट, गणांची वाटणी होईल. पण, स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास वेगळे चित्र पाहायला मिळेल. सध्या तरी दोन्ही राजेंची भूमिका गुलदस्त्यात असल्याने मनोमिलनाबाबत सस्पेन्स पाहायला मिळत आहे.
advertisement
सातारा नगरपालिकेबाबत उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मात्र मंत्री शिवेंद्रराजे यांनी मनोमिलनाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडल्यामुळे दोघांच्या मनोमिलनाबाबत सस्पेन्स पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असून याबाबत आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित होते या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा नगरपालिके बाबत मनोमिलन होणार का विचारले असता त्यांनी मनोमिलन होणार असल्याचं यावेळी सांगितलं. यादरम्यान त्यांनी मला नगराध्यक्ष व्हायचंय असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन मी नगराध्यक्ष होणार अशी मजेशीर प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.
शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र सातारा नगरपालिकेच्या मनोमिलनाच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. भाजप श्रेष्ठी जो निर्णय देतील तो सर्वसामान्य लोकांचा हिताचा निर्णय असेल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया देऊन मनोमिलनाबाबत सस्पेन्स कायम ठेवलेला पाहायला मिळत आहे. येत्या पाच सहा दिवसात अंतिम निर्णय होईल. भाजप श्रेष्ठी, देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो सर्वसामान्य लोकांचा हिताचा निर्णय असेल, तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजेंनी दिली.
2016 साली झालेल्या निवडणुकीत उदयनराजेंच्या पॅनेलने मोठं मताधिक्य
गेल्या वेळच्या म्हणजे, नोव्हेंबर 2016 साली झालेल्या निवडणुकीत उदयनराजेंच्या पॅनेलने मोठं मताधिक्य मिळवत शिवेंद्रराजेंच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यामध्ये उदनयराजे गटाच्या माधवी कदम यांनी नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजेंचा 3 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
