शनिवारी, मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेजस्विनी घोसाळकर आणि त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांच्या वॉर्डातील शाखा प्रमुख आणि गटप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत तेजस्विनी घोसाळकर यांच्या वाढत्या नाराजीबाबत आणि त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेवर विचारमंथन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घोसाळकर कुटुंब हे मातोश्रीचे निकटवर्तीय समजले जातात. विनोद घोसाळकर हे आमदार देखील होते. मात्र, त्यांची सून तेजस्विनी यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी काही पदाधिकाऱ्यांबाबत तक्रार केली आहे. तेजस्विनी यांचे पती अभिषेक हे देखील नगरसेवक होते. मात्र, त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मारेकऱ्याने स्वत:ला संपवले, हत्येचा थरार फेसबुक लाइव्ह दरम्यान झाला होता.
advertisement
या वॉर्डातून तेजस्विनी घोसाळकर यांच्यासह आणखी दोन इच्छुक उमेदवार असल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरेंनी बैठकीत तेजस्विनी यांनाच महापालिका निवडणुकीसाठी गो अहेड दिला असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेवर अजूनही पूर्ण विश्वास ठेवता येत नसल्याचा सूर उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून जाणवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घोसाळकरांनी पक्ष सोडला तर काय?
तेजस्विनी घोसाळकर यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचे म्हटले. मात्र, ऐन महापालिका निवडणुकीच्या वेळी पक्ष सोडल्यास काय करता येईल, याचा विचारही मातोश्रीवर झाला असल्याचे म्हटले जात आहे. "तेजस्विनींची भूमिका जर अजूनही संशयास्पद असेल, तर अशा स्थितीत आपण काय करावं?" असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केला, असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरेंची भावनिक साद...
याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन केलं – "अंतिम निर्णय घेण्याआधी तुम्ही ठरवा, तुम्ही घोसाळकरांचे कार्यकर्ते आहात की शिवसेनेचे शिवसैनिक?" यामागे तेजस्विनी घोसाळकर जर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या शाखेतील अनेक पदाधिकारीही त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, उद्धव ठाकरेंनी ही चिंता व्यक्त केल्याचं सूत्रांकडून समजतं.