मुंबई महापालिकेच्या सत्तेतून शिवसेना ठाकरे गटाचं अस्तित्व संपवण्यासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट जोरदार प्रयत्नशील आहे. तर, दुसरीकडे आपला बालेकिल्ला शाबूत असल्याचे दाखवण्यासाठी ठाकरे गट जोरदार प्रयत्न करत आहे. अशातच या निवडणुकीसाठी उमेदवारही महत्त्वाचे असणार आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमेदवारांबाबत महत्त्वाचा निर्णय 'मातोश्री'ने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेसमोर आता नव्या उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक बांधणी यावर भर दिला जात आहे.
ठाकरेंचे उमेदवारांबाबत मोठा निर्णय...
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षातील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्यांच्या अनुभवाचा सन्मान राखत, त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार पक्षात सुरू आहे. त्यामुळे जुने आणि माजी नगसेवक नाराज होणार नाहीत.
या निर्णयामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखण्यावर भर दिला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या यादीत किमान ७० टक्के उमेदवार नवे चेहरे असतील. यामुळे तरुण शिवसैनिकांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
मनसेसोबत जागा वाटपाचं काय?
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मागील काही दिवसांत अनेक संयुक्त बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. या बैठकींमध्ये प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभाव लक्षात घेऊन जागा वाटपाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
