ठाकरे गटाने आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत डबेवाला असोसिएशनने ठाकरे गटाला दिलेला पाठिंबा मागे घेतला असून आगामी निवडणुकीत साथ न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याचा मुख्य आरोप करत डबेवाल्यांनी हे पाऊल उचलले. त्यामुळे आधीच कठीण स्थितीत असलेल्या ठाकरे गटाची राजकीय चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
ठाकरेंनी कोणती आश्वासने दिलेली?
२०१७ च्या बीएमसी निवडणुकीदरम्यान शिवसेनेने मुंबईतील डबेवाल्यांना अनेक सोयी–सुविधा आणि विकासात्मक योजना देण्याचे आश्वासन दिले होते. यात डबेवाल्यांना संघटित करून स्वतंत्र कंपनी स्थापन करणे, त्या कंपनीला पहिल्या वर्षी किमान पाच कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देणे, सायकलींची खरेदी आणि सायकल पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे, मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी आरोग्यसेवा देण्यासाठी कॉर्पोरेट व सामाजिक संस्थांमार्फत मदत मिळवून देणे, तसेच डबेवाला भवन उभारणे यांसारख्या सुविधा समाविष्ट होत्या.
मात्र, या सर्व आश्वासनांपैकी फक्त ‘डबेवाला भवन’ उभारण्याचं वचनच काही प्रमाणात पूर्ण करण्यात आल्याचा डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आरोप केला. इतर कोणतीही सुविधा प्रत्यक्षात मिळाली नसल्याने संघटनेने आता ठाकरे गटाला “अखेरचा जय महाराष्ट्र” देत पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीच्या उंबरठ्यावर होत असलेल्या या निर्णयाचा परिणाम मुंबईतील मराठी मतदारांच्या पारंपरिक गोटांवर होण्याची शक्यता असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
आता महायुतीला पाठिंबा...
मुंबई डबेवाला असोसिएशनने लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता. महायुती सरकारने डबेवाल्यांचा प्रलंबित असलेला घरांचा प्रश्न सोडवल्याने आता इतर प्रश्नही सुटतील असा विश्वास वाटत असल्याने आम्ही महायुतीला पाठिंबा देत असल्याचे तळेकर यांनी सांगितले.
