सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी वेगाने सुरू आहेत. भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्याच्या प्रस्तावानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नाराजीची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटासोबत स्थानिक पातळीवर एकत्र जाण्याच्या हालचालींमुळे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कणकवली नगर पंचायत अध्यक्षपदासाठी भाजपकडून समीर नलावडे इच्छुक आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडी आणि शिंदेसेना हातमिळवणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात होती. नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटातील नेते संदेश पारकर यांचे नाव पुढे आले होते.
advertisement
>> मातोश्रीवर काय झालं?
भाजपविरोधात “सर्वपक्षीय शहर विकास आघाडी” स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या आघाडीत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस स्थानिक स्तरावर एकत्र येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका न घेता नाराजी दर्शवली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कणकवलीतील स्थानिक नेते संदेश पारकर आणि वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांना हा प्रस्ताव मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न केले. कणकवलीत भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या वर्चस्वाविरोधात एकत्रित आघाडीचा प्रस्ताव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला. मात्र, उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासोबत जाण्याच्या कल्पनेलाच विरोध दर्शवला असल्याचं सांगितलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर कणकवलीतील निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) नेमकी कोणत्या आघाडीसोबत जाणार, याबाबत संभ्रम कायम आहे. ठाकरे गट स्वतंत्र लढाईला प्राधान्य देईल का, की भाजपविरोधी मत एकत्र ठेवण्यासाठी तात्पुरता तडजोडीचा मार्ग स्वीकारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
