उद्धव-राज यांची युती नक्की पण...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले आहेत. मात्र, युती कधी जाहीर होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अधिकृतपणे युतीची घोषणा करणार आहेत. मात्र, ही घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक-दोन दिवस आधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळेच २२ किंवा २३ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांच्या युतीची घोषणा करतील.
advertisement
राज आणि उद्धव ठाकरे यांचा मास्टरस्ट्रोक...
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा एका जाहीर सभेच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चांनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे सूर चांगलेच जुळले होते. दोन्ही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी या युतीचे स्वागत केले होते. त्यानंतर आता दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणखी वाढवण्यासाठी एका सभेत युतीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन्ही पक्षांमधील नाराज इच्छुक उमेदवार भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू नये यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी युती अशा सभेच्या माध्यमातून जाहीर करण्याची कल्पना अंमलात आणली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या घोषणेसोबत दोन्ही पक्ष आपला वचननामा जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, उमेदवारांची यादीदेखील जाहीर करतील असे म्हटले जात आहे. नाराजांमुळे ठाकरेंच्या युतीला कोणताही फटका बसू नये यासाठीची काळजी घेतली जात आहे. उमेदवारांना फोनवरून संपर्क साधून थेट एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
