मतदारयादीच्या घोळावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शनिवारी, महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईत मोर्चाही काढण्यात आला. त्यावर आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मविआच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. शेलार यांनी मविआ, राज ठाकरे हे तुष्टीकरणाचा आरोप करत मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदारांबाबत दावा केला. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी शेलार यांचे अभिनंदन केले.
advertisement
शेलारांचे अभिनंदन, त्यांनी...
आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी प्रथम आशिष शेलार यांचे अभिनंदन करतो. शेलार यांनी आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवलं आहे. आशिष शेलार यांनी हे सिद्ध केलं की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आम्ही देखील घोळ असल्याचे वारंवार सांगत आहोत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला नाकारले होते. आता शेलार यांनी मतदारयादीतला घोळ मान्य केला असल्याचे त्यांनी सांगितले. आशिष शेलार यांचं कौतुक करतो की त्यांनी हिम्मत केली. अमित शहा ते पंतप्रधान मोदी यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांना खोटं ठरवलं. आशिष शेलार यांचं काय बिनसलं आहे माहीत नाही पण त्याचं कौतुक करतो असेही ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, आम्ही मतदारयादीत घोळ असल्याचे सांगितले. मतदारयादी अमुक नावे वगळा तमुक नावे वगळा असे म्हटले नाही. आता शेलार यांची उठबस त्या लोकांमध्ये आहे त्यामुळे त्यांना ती लोकं सापडली. आम्ही या लोकांमध्ये जास्त असतो म्हणून आम्हाला ही लोकं मिळाली असल्याचा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मतदार ओळख केंद्र सुरू करणार
दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गटाच्या शाखांमध्ये मतदार ओळख केंद्र सुरू करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शाखेत येऊन मतदार यादीत आपले नाव आहे का, आपल्या घराच्या पत्त्यावर इतर मतदार वास्तव्य करतात का, याची माहिती घेण्याची विनंती आपण मतदारांना करत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. निवडणूक आयोगाचे सक्षम अॅप आहे. मात्र, हे अॅप भलतेच लोक चालवत असल्याची शंकादेखील त्यांनी उपस्थित केली. आपलं नाव मतदारयादीतून वगळण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सगळ्याच मतदारांनी आपले नाव मतदारयादीत आहे का, हे पाहावे असे आवाहन त्यांनी केले.
झेन-जीला सरकार घाबरतय...
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, १ जुलै २०२५ ही मतदार यादीची कट ऑफ ठेवण्यात आली आहे. मात्र, नवमतदारांना त्यांचा मताचा अधिकार या निवडणुकीत बजावता येणार नाही. सरकार Gen-Z ला घाबरत आहे का, असा सवाल त्यांनी केला. वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्य नवमतदारांनी देखील आपली विनंती पत्रे शिवसेना ठाकरे शाखेत द्यावी, जेणेकरून किती लोकांना मतदानापासून वंचित ठेवले जात आहे, याची माहिती सरकारला देता येईल, असेही त्यांनी म्हटले.
