उद्धव ठाकरे गुरुवारी पूरग्रस्त भागात पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुसळधार पावसामुळं मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पुराच्या पाण्यानं सगळं काही हिरावून नेलंय. पूरग्रस्तांनी उद्धव ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली. तर उद्धव ठाकरेंनीही नुकसानग्रस्तांना धीर दिला. राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी २ हजार २१५ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पण आता तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी सरकारला जाब विचारलाय. केवळ मराठवाड्यासाठी देखील एवढे पैसे पुरेसे नाहीत, असे सांगत सरकारने वाढीव मदत द्यावी, असे ठाकरे म्हणाले.
advertisement
बिहारमध्ये निवडणुका आहेत. तेथील महिलांच्या खात्यात नरेंद्र मोदी १०-१० हजार टाकणार आहेत. मला महाराष्ट्रातील सरकारला सांगायचे आहे, डबल इंजिन सरकार आहे म्हणून सांगता ते केवळ धूर सोडायला काय? राज्यात ओला दुष्काळ आहे. केंद्राकडे जा. कोरोना काळात पीएम केअर फंडात महाराष्ट्रातल्या उद्योगपतींनी आणि भाजप आमदार खासदारांनी अडीच लाख कोटी दिले. त्यातील ५० हजार कोटी दिले तरी शेतकरी कर्जमुक्त होतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकीकडं शेतकरी पूराच्या संकटात अडकलाय तर दुसरीकडं बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवण्यास सुरुवात केलीय. यावर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा एकत्र करून शिवसेना शाखेत द्या, पुढे काय करायचं, हे आम्ही पाहतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठवाड्यातील पूरानंतर आता मंत्री आणि राजकीय नेत्यांचे दौऱ्यांचा सिलसिला सुरु झालाय. सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आता विरोधही बांधावर पोहोचलेत. पण या दौऱ्यावरून आरोप-प्रत्यारोपांचा पूर आलाय.