इतका पाऊस पडत असूनही उकाडा मात्र कायम आहे. पाऊस पडेल तेवढाच वेळ तात्पुरता गारवा जाणवतो. मात्र त्यानंतर उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा चाळीशी पार जात असताना, आता वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजस्थानवर असलेल्या 'सायक्लोनिक सर्क्युलेशन'मुळे अरबी समुद्रातील आर्द्रता महाराष्ट्राकडे सरकत आहे. याचा परिणाम म्हणून ३ ते ५ एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
advertisement
महाराष्ट्रात 48 तास कसं राहील हवामान?
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे आणि जळगाव या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहतील.छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ३ आणि ४ एप्रिलला पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होऊ शकतो. हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांतील काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. 60 ते 70 किमी वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उन्हाचा कडाका कायम असला तरी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुण्यातही काही भागात हलक्या सरी कोसळू शकतात. तर मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
का पडतोय पाऊस?
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताच्या उत्तर भागात एक ट्रफ लाईन सक्रिय आहे, जी सिंधपासून अरबी समुद्रापर्यंत पसरली आहे. या प्रणालीमुळे समुद्रातील ओलावा जमिनीवर येत असून, वाढलेल्या तापमानामुळे स्थानिक पातळीवर पावसाचे ढग तयार होत आहेत.
विशेषतः उत्तर भारतातून येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तिथून येणार्या वाऱ्यांमुळे उत्तर भारतात हवामान बदललं आहे. अरबी समुद्रातही हवामान बदललं आहे. त्यामुळे तिथून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे.
महाराष्ट्रात कुठे किती झालं नुकसान
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील गंगाधाम चौकात होर्डिंग कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. अनेक ठिकाणी झाडं कोसळलीये. पुण्यातील कोंढवा परिसरात वाहनांवर झाडं कोसळलं आहे.
कोंढवा परिसरात ज्योती रेस्टॉरंट समोर चारचाकी वाहनावर झाड पडल्याने वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं. पुलाखालच्या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. पुढील पावसाळ्यात काय होणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळपासून वादळी वारा आणि गारपीट झाली, त्यामुळे मका, बाजरी, गहू आणि फळबागांना मोठा फटका बसला. जळगावसह धरणगाव, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यात पावसाचा जास्त प्रभाव दिसून आला. सांगली, कराड, मनमाड, मावळ, जळगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाने धुमशान घातलं. अनेक भागात काही काळासाठी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.
