सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी वेगाने सुरू आहेत. भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्याच्या प्रस्तावानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नाराजीची चर्चा समोर आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटासोबत स्थानिक पातळीवर एकत्र जाण्याच्या हालचालींमुळे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरील बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे वृत्त समोर आले होते.
advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठी हालचाल होत असून, कणकवली शहरात होणारी आघाडी ही शिंदे गटाशी नव्हे, तर स्थानिक स्तरावर स्थापन होणाऱ्या ‘शहर विकास आघाडी’च्या रूपात असेल, अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
‘न्यूज १८ लोकमत’शी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, “कणकवली शहर विकास आघाडीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. ही आघाडी कोणत्याही एकाच राजकीय पक्षाशी संलग्न नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केली जात आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, या संकल्पनेबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्ण माहिती देण्यात आली असून, त्यांनीही या आघाडीला सहमती दर्शविली आहे.
उद्धव ठाकरे नाराज?
उद्धव ठाकरे हे या युतीच्या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, वैभव नाईक यांनी त्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्व तपशील सांगितले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कोणतीही नाराजी नसल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नवीन राजकीय चाचपणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
