मुंबई आणि लातूर ही दोन शहरं एकमेकांना जोडण्यासाठी लातूरमधील लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांकडून मागणी केली जात होती. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते लातूर वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली आहे. ही वेगवान गाडी सुरू झाल्यास प्रवाशांना या सेवेचा लाभ होईल. मुंबईत ये-जा करण्याचा प्रवास कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरवण्यासाठी राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांना वंदे भारतच्या माध्यमातून मुंबईशी जोडलं जात आहे.
advertisement
देशातील सोयाबीनचे सर्वात मोठं व्यापारी केंद्र लातूर येथे आहे. याशिवाय, सिद्धेश्वर, रत्नेश्वर मंदिर, अष्टविनायक मंदिर, विराट हनुमान मंदिर, सूरत शहवली दर्गा अशी धार्मिकस्थळं देखील आहेत. उदगीर किल्ला, औसा किल्ला, खरोजा लेण्या आणि गंज गोलाई बाजारपेठ प्रसिद्ध आहे. त्यामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि व्यापारी केंद्र म्हणून लातूर प्रसिद्ध आहे. मुंबई ते लातूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत अद्याप आमच्यापर्यंत माहिती आलेली नाही, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी दिली.
वंदे भारत कोठे थांबणार?
सीएसएमटी-लातूर वंदे भारत एक्सप्रेसला सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी, धाराशिव आणि लातूर असे थांबे देण्याचं नियोजन आहे. ही गाडी सीएसएमटीवरून सकाळी 6 वाजता लातूरच्या दिशेने निघेल आणि लातूर येथे दुपारी 1 ते दीड वाजण्याच्या सुमारास पोहचेल. या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.